अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली !
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील भडगाव रोडवरील वाणी मंगल कार्यालयासमोर डी. के. टेलर दुकानाच्या बाजूला असलेल्या छताला एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २९ रोजी सकाळी ८.२५ वाजेपूर्वी उघडकीस आली होती. त्या प्रौढाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनात हवालदार प्रशांत पाटील, पो.कॉ. अमोल पाटील, हरिचंद्र पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली. तर तंत्रज्ञानाच्या आधारे, मोबाईल लोकेशन व रेल्वे स्टेशनचे फुटेज प्राप्त करून मयत प्रौढ हा ज्या रेल्वे स्टेशनवरून बसला होता, त्या रेल्वे स्टेशनचे फुटेज प्राप्त करून त्याचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.
या मयत व्यक्तीचे नाव किशन कुमार सबला कुमार असून उत्तराखंड टिहरीगड जिल्ह्यातील परोगी येथील रहिवासी आहेत. तर उत्तराखंड येथील प्रशासनाशी संपर्क साधून त्याच्या भावांच्या ताब्यात त्यांचा मृतदेह देण्यात आला आहे. मयत व्यक्तीची ओळख नसताना चाळीसगाव शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या दोन दिवसात मृतदेहाची ओळख पटवल्याने सर्व पोलिसांचे कौतुक होत आहे.