अजित पवार अॅक्शन मोडवर : ‘त्या’ कामकाजाची होणार चौकशी
बीड वृत्तसंस्था – बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांच्या घोषणेचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्वागत केले आहे, त्यांनी या संदर्भात एक्स पोस्टवरून माहिती दिली आहे.
दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाला. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. याबाबत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. नियोजन समितीची बैठक होताच आता 2023-24 आणि 2024-25 सालच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्वकष चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीत तीन सदस्यीय चौकशी पथक समिती गठीत करण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यतेची चौकशी करण्यासाठी गठीत पथकाद्वारे बीडमधील मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, त्याकरिता निधी वितरण याची चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान एका आठवड्यात हा अहवाल सादर करावा असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिले आहेत, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
या चौकशी पथकात धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष असतील तर अर्थ आणि सांख्यिकी संचलनालय अपर संचालक म.का. भांगे व जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचा समावेश आहे, असे देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.