अधिकारी,ठेकेदार,लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने म्हैसवाडी गावात चुकीची,निकृष्ट प्रतीची कामे!
ग्रामपंचायत माजी सदस्यांने केली तक्रार!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील म्हैसवाडी ग्रामपंचायत मार्फत अधिकारी, कर्मचारी,लोकप्रतिनिधी,शासकीय अभियंता,ठेकेदार व काही बोगस मजूर संगनमताने म्हैसवाडी गावात ठक्कर बापू योजनेअंतर्गत,तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या चुकीच्या व इतरत्र ठिकाणी सुरू असलेल्या बोगस कामांसंदर्भात चौकशी होऊन कार्यवाही करणेबाबत म्हैसवाडी ग्रा.पं.माजी सदस्य किरण पांडव यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.
रोजगार हमी योजनेचे डेपोटी कलेक्टर,यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपअभियंता,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी,वन विभाग यावल पूर्व वनक्षेत्रपाल, तसेच यावल तहसीलदार यांच्याकडे दि.१३ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात किरण पांडव यांनी नमूद केले आहे की,म्हैसवाडी गावातील वार्ड क्र.१ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे ठक्कर बापा योजनेअंतर्गत काँक्रीटीकरणाचे काम त्या वार्डात न करता सरपंच उपसरपंच व संबंधित अधिकारी ठेकेदार यांनी संगनमत साधून दुसऱ्या वार्ड क्र. ३ मध्ये केले.त्यामुळे आदिवासी एस.टी.वार्ड क्र.१ मधील नागरिकांवर अन्याय अत्याचार झाल्याने संपूर्ण संबंधित यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.रोजगार हमी योजना अटी शर्ती नियम खड्ड्यात – रोजगार हमी योजनेमार्फत काँक्रिटीकरण त्याचा पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे या योजनेत प्रत्यक्ष मजूर वर्गाकडून काम न करता मशनरी मार्फत काम केले जात आहे. कामावर बोगस,बेकायदा मजूर दाखवून गावातील काही मजुरांना विश्वासात घेऊन त्यांना थोडीफार रक्कम देऊन बाकीची रक्कम स्वतः बिल काढणाऱ्यांनी घेतली आहे. हे काम अत्यंत निकृष्ट प्रतीच्या बांधकाम साहित्यात करण्यात आले या कामात संबंधित अधिकाऱ्याचे, शाखा अभियंत्याचे,ठेकेदाराचे संगमत असल्याने मोठा गैरप्रकार भ्रष्टाचार झाला आहे.म्हैसवाडी गावात जी निकृष्ट प्रतीची कामे झाली ती कामे चांगली कशी झाली याचे फलक फक्त फोटोग्राफी करून वरिष्ठांना दाखविण्यासाठी फलक लावले गेले त्यानंतर ते फलक लगेच फलक काढून घेतले याला काय म्हणावे..? ग्रामस्थांना योजनेची कामाची माहिती होऊ नये म्हणून फलक काढून घेतले आहेत का असा प्रश्न ग्रामस्थांसह तक्रारदारांमध्ये उपस्थित केला जात आहे.
बेसुमारोप वृक्षतोड – म्हैसवाडी गावात विकास कामे करण्याच्या नावाखाली भवानी मातेच्या मंदिराजवळील पिंपळाचे डेरेदार वृक्ष,त्या शेजारील बेलाचे झाड, म्हसोबा मंदिराजवळील कडुनिंबाचे डेरेदार वृक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या गेट समोरील एक वृक्ष, व ठीक ठिकाणी वृक्षाच्या कुंड्या तोडून टाकल्या. अशी वृक्षतोड केल्यानंतर नवीन वृक्ष लागवड केली आहे किंवा नाही..? तसेच गावातील वृक्षतोड करताना ग्रामपंचायतीने किंवा संबंधित ठेकेदाराने वनविभागाची,महसूल विभागाची रीतसर परवानगी घेतली होती का..? इत्यादी
सर्व कामांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी म्हैसवाडी ग्रा.पं. माजी सदस्य किरण पांडव यांनी केली आहे.