अपघात : दुचाकीच्या चाकात साडी अडकली अन् महिलेचा दुर्देवी मृत्यू !
जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सिल्लोड येथे प्लॉटच्या कामासाठी दुचाकीवरून जाताना दुचाकीच्या चाकात साडी अडकल्याने झालेल्या अपघातात पहुर येथील ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दि.३० रोजी घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मनीषा कैलास चौधरी या त्यांचा मुलगा ऋषी चौधरी याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे प्लॉटच्या कामासाठी जात होत्या. छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील सिल्लोड शहराजवळ दुचाकीच्या मागील चाकात मनीषा चौधरी यांच्या साडीचा पदर अडकल्याने त्याखाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना तत्काळ सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंति त्यांना मयत घोषित केले. मनीषा चौधरी या पहूर येथील जळगाव मार्गावर राहत होत्या. मनमिळाऊ स्वभाव आणि सहकार्याची भावना असणाऱ्या मनीषा चौधरी यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत मनीषा चौधरी यांच्या पश्चात पती, २ मुले, सुन, नातू असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे पहुर परिसरावर शोककळा पसरली आहे.