अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला ५ वर्षाचा सश्रम कारावास
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला अमळनेर विशेष न्यायालयाने ५ वर्षाचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी बुधवारी हा निकाल दिला. लोटन पंडित पाटील (६१), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दंड न भरल्यास त्याला आणखी सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. अत्याचाराची ही घटना ९ जानेवारी २०२४ रोजी तालुक्यातील एका गावात घडली होती.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, पीडितेच्या नातेवाइकांनी तक्रार दाखल केली होती. आरोपीस ११ जानेवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. ९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास, पीडित बालिका आपल्या घराच्या बाहेर असताना हा धक्कादायक प्रकार घडला. निष्पाप मुलीकडे पाहून आरोपीने तिला लक्ष्य केले. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काकू तिथे धावून आली आणि हे पाहताच आरोपी घाबरून पळून गेला.नातेवाइकांनी विलंब न लावता पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी वेगाने कारवाई करत अवघ्या दोनच दिवसांत ११ जानेवारीला आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला आणि सबळ पुरावे गोळा करून आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.या खटल्यात सरकारी वकील अॅड. आर. बी. चौधरी यांनी आवश्यक ती सर्व साक्षी मांडल्या. एकूण ९ साक्षीदार तपासले गेले, ज्यामध्ये पीडित मुलगी, फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षींना न्यायालयाने महत्त्व दिले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १० अंतर्गत आरोपीला ५ वर्षांची सश्रम शिक्षा सुनावली तसेच, ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ६ महिने शिक्षा भोगावी लागेल, असा आदेशही देण्यात आला. तपासकार्यासाठी पोलिस कर्मचारी राहुल रणधीर, फौजदार उदयसिंग साळुंके, पो. हे. कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, प्रमोद पाटील, भरत इशी आणि सतीश भोई यांनी सहकार्य केले.