आपल्या क्षमतेनुसार ग्राम विकासाचा ध्यास घ्या.
यावल दि.४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळच्या वतीने राजोरे तालुका यावल येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी बौद्धिक सत्रात ग्रामीण विकासासाठी युवा जनजागृती या विषयावर डॉ नरेंद्र महाले यांनी विद्यार्थ्यांना ग्रामव्यवस्थेमध्ये युवकांची जबाबदारी, हक्क व कर्तव्य यांची जाणीव करून दिली. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामव्यवस्थेचे सुदृढीकरण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले.युवकांनी ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर प्रथमतः स्वतःच्या क्षमता ओळखून त्या क्षमतेनुसार ज्ञानार्जन करून ग्रामव्यवस्थेच्या विकासासाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा असा मौलिक विचार डॉ.महाले यांनी मांडला. त्याच बरोबर आपल्या मनोरंजक व प्रबोधनात्मक शैलीतून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासातून देशविकास साधण्यासाठी युवकांची भूमिका कशी असावी या संदर्भात वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.याप्रसंगी शिबिराचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ राजेश ढाके,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील,सहाय्यक अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, समाजसेवक मयूर महाजन व प्रकाश चौधरी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मांडले.