आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर छापा : पिता-पुत्रासह तिघांवर गुन्हा दाखल !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर छापा टाकून पिता-पुत्रासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर येथील स्टेशन रोडवरील रामचंद्र नगर भागात शनिवारी ही कारवाई झाली. त्यांच्याकडून जवळपास सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, हिरामण दगडू चौधरी (६२) व मुलगा आकाश हिरामण चौधरी (३०, दोन्ही रा. रामचंद्र नगर, रावेर) आणि अमनखा मन्सूरखां (रा. उटखेडा रोड, फतेहनगर, रावेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रावेर शहरात रामचंद्र नगरात पोलिसांनी हा छापा टाकला, त्यावेळी तिथे असलेल्या दोन जणांनी गल्ली बोळाचा फायदा घेऊन धूम ठोकली. मात्र जुगार घेणारे हिरामण चौधरी व त्यांचा मुलगा आकाश चौधरी यांच्याकडे जुगाराचे बुक व काही मोबाइल तथा १ लाख १ हजार रुपयांची रोकड आढळून आली. दुसऱ्या कारवाईत शहरातील एका चौकात सट्टा घेणारा अमनखा मन्सूरखां यास पकडण्यात आले. त्याच्याकडे जुगाराचे बुक व मोबाइल तथा ११ हजार रुपये रोख आढळून आले