एकाच मध्यरात्री चोरट्यांनी घरासह दुकाने फोडली ; रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास!
बोदवड खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील जामठी येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर घर व काही दुकाने चोरट्यांनी फोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लांबविला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,बुधवारी रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास जामठी येथील राजेंद्र चौधरी यांचे किराणा दुकान तसेच संजय तपे यांचे घर चोरट्यांनी फोडले. यानंतर भारत पान सेंटर, अमोल गोसावी पान सेंटर, क्रिष्णा पाटील ही दुकाने फोडली. यात रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले आहे. चोरट्यांनी दुकाने फोडण्याच्या आधी दुकानासमोर मोटारसायकल लावून चोरीचा प्रयत्न केला आहे. सीसीटीव्हीत दुचाकीवर ये-जा करताना दिसून येत आहेत. तपास बोदवड पोलिस करीत आहेत.
गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा निधी खर्च करून गावात सीसीटीव्ही बसविले होते. मात्र, वर्षभरातच नादुरुस्त झाले. काही सीसीटीव्ही बंद, तर काहींची दिशा चुकीची आहे. ग्रामपंचायतीने त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.