कपड्याच्या दुकानाला भीषण आग ! आग विझविण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांना लागले तब्बल दोन तास
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील सेंट्रल फुले मार्केटमधील पुजा कलेक्शन या दुकानाला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचा अग्शिमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र मार्केटमधील अतिक्रमणामुळे बंब घटनास्थळापर्यंत पोहचण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे उशिर झाला. त्यामुळे आगीत दुकानातील कपडे जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शहरातील सेंट्रल फुले मार्केटमधील ग्राऊंड फ्लोअरवर असलेल्या पुजा कलेक्शन या दुकानाला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे आगीचे लोळ दुकानाबाहेर निघू लागले. हा प्रकार मालकाच्या लक्षात येताच त्यांनी मनपाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. परंतु फुले मार्केटमधील अनधिकृत अतिक्रमणाने विळखा घातल्यामुळे बंब आत शिरण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्याने आग वाढतच होती. परंतु काही वेळानंतर अतिक्रमणातून बंबाने वाट काढत बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अगिवर पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीमुळे दुकानातील कपडे जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापक्ररणी पोलिसात उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.