किरकोळ कारणावरुन वाद : क्रिकेट खेळणाऱ्यांकडून शिवीगाळ करीत तरुणाला जबर मारहाण ! !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – किर्तन सुरु असतांना त्याठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांकडून शिवीगाळ करीत गोंधळ घातला जात होता. त्यांना शिवीगाळ करु नका असे म्हटल्याचा राग आल्याने सुमारे वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने बिजासन फकिरा घुगे (वय २९, रा. महादेव मंदिराजवळ मेहरुण) या तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास मेहरुण परिसरातील महादेव मंदिरजवळ घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात पळापळ होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील मेहरुण परिसरातील महादेव मंदिराजवळ महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी किर्तन सुरु असतांना त्याच परिसरात काही तरुण क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळतांना त्या तरुणांकडून गोंधळ घालून शिवीगाळ केली जात होती. दरम्यान, काही जणांनी त्या तरुणांना शिविगाळ करु नका असे म्हटले. त्याचा राग आल्याने सुमारे २० ते ३० जणांच्या टोळक्याने त्याठिकाणी येत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्या टोळक्याने बिजासन फकिरा घुगे या तरुणाला लाथा बुक्क्यांसह दगडाने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अचानक वाद झाल्यामुळे परिसरात पळापळ होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.