किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाला चौघांनी केली जबर मारहाण !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील काशीराम नगरात घरासमोर दुचाकी लावल्याचा जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून एका रिक्षाचालकाला शेजारी राहणाऱ्या चार जणांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीला आला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील काशीराम नगरात गणेश सीताराम बाविस्कर (वय ३४) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. शेजारी राहणाऱ्या शांताराम खेडवणकर यांनी त्यांची दुचाकी ही गणेश बाविस्कर यांच्या घरासमोर लावलेली होती. २२ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता गणेशचा भाऊ समाधान याने शेजारी राहणाऱ्यांना दुचाकी लावण्याचा जाब विचारला, त्यावरून दोघांचा वाद सुरू होता. भावाचे भांडण सोडवण्यासाठी गणेश बाविस्कर गेले असता शेजारी राहणारे शांताराम खेडवणकर, सीताराम खडवणकर, शोभा खेडणकर आणि गौरव खेडवणकर (सर्व रा. काशीराम नगर, भुसावळ) यांनी त्यांना शिवीगाळ्ळ केली. तसेच गणेशच्या डोक्यात लांखडी रॉड टाकला.
या मारहाणीत गणेश गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी गणेश बाविस्कर याने दिलेल्या फिर्यादीवरून शांताराम खेडवणकर, सीताराम खडवणकर, शोभा खेडणकर आणि गौरव खेडवणकर यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. दीपक पाटील करत आहे.