कृषी विज्ञान केंद्रात कापूस विशेष प्रकल्प अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगाव :- कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जळगाव येथे राष्ट्रीय किसान दिनानिमित्त केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर आणि कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद जळगाव यांच्यावतीने कापूस विशेष प्रकल्प अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.व्ही. के जळगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ.हेमंत बाहेती तसेच कुरबान तडवी जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद जाधव यांनी केले. यावेळी कुरबान तडवी यांनी शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्ता पूर्ण कापूस निर्मितीवर भर द्यावा याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. डॉ. हेमंत बाहेती यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच बोंड अळीला अटकाव करण्यासाठी फरदड घेऊ नका असे आवाहन केले. कापूस विशेष प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. शरद जाधव यांनी शेतकऱ्यांना सघन पद्धतीने कपाशी लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे संपूर्ण
मार्गदर्शन केले. तर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेतज्ञ वैभव सूर्यवंशी यांनी कपाशी काढणीसाठी श्रेडर या यंत्रा संबंधित तांत्रिक माहिती दिली. तर मयुरी देशमुख यांनी दादा लाड तंत्रज्ञानामध्ये उत्पन्न वाढीसोबतच जमिनीचे आरोग्य कसे जपावे..? याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. याचबरोबर सदरील कार्यशाळेमध्ये चालू हंगामामध्ये दादाला तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी तसेच परिसरातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर के व्ही. के. च्या प्रक्षेत्रावर कापूस श्रेडर द्वारे कापूस पऱ्हाटी श्रेडिंगचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता आशिष पवार, अक्षय पाटील , नितीन पाटील व प्रथमेश वाल्हे यांनी पुढाकार घेतला .