कॅफेतला धक्कादायक प्रकार : चॉकलेटच्या नावाखाली दिलं ‘उंदीर शेक’ !
पुणे वृत्तसंस्था – राज्यातील अनेक ठिकाणी खळबळजनक घटना घडत असताना नुकतेच पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात घरपोच मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर सापडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चॉकलेट शेक देणाऱ्या कॅफेमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या तरुणाच्या मैत्रिणीने शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी परिसरातील एका कॅफेतून चॉकलेट शेक मागवला होता. तिने घरपोच खाद्यपदार्थ देणाऱ्या एका अॅपवर त्याची नोंदणी केली होती. ही तरुणी लोहगाव परिसरात वास्तव्याला आहे. खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीचा कामगार हा चॉकलेट शेक घेऊन रात्री तरुणीच्या घरी गेला. या तरुणीने चॉकलेट शेक पिण्यापूर्वी ग्लास पाहिला. तेव्हा त्यामध्ये मृतावस्थेतील उंदराचे पिल्लू दिसले. या घटनेनंतर तरुणीने तिच्या मित्राला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तरुणाने संबंधित कॅफेमालकाशी संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा कॅफे मालकाने या तरुणाला धमकावले. त्यानंतर या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. खाद्यपदार्थ तयार करताना पुरेशी काळजी न घेता ग्राहकांच्या जीविताला धोका होईल, असे कृत्य कॅफेमालकाने केल्याचे या तरुणाने फिर्यादीत नमूद केले आहे.