क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यावल दि.१४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
न्यायतज्ञ,अर्थतज्ञ,तत्त्वज्ञ,बुद्धिवंत, भारताचे पहिले कायदेमंत्री,समाज सुधारक,भारतीय घटनेचे शिल्पकार अशा अनेक पैलूंचे एकत्रिकरण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय.
मध्य प्रदेशातील महू येथे 14 एप्रिल1891 या दिवशी भीमराव बाबासाहेब आंबेडकर नावाचे एक क्रांतीसुर्य जन्माला आले. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भिमाबाई होते. लहान वयापासूनच भीमराव खूप हुशार होते. इ.स. 1896 च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेत भीमरावांचे नाव दाखल केले. पुढे सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये 1904 मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व त्या वर्षीच भीमरावांचे वडील मुंबईला सहकुटुंब राहण्यासाठी गेले. नोव्हेंबर 1896 ते 1923 या 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी यादरम्यान बी.ए. दोनदा एम. ए, पीएचडी, एम.एस्सी, बार ॲट लॉ आणि डी.एस्सी या पदव्या मिळवल्या. 1950 च्या दशकात त्यांना एल एल डी आणि डीलिट या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या. बाबासाहेब हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएचडी) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट( पीएचडी व डी एस सी ) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. महामानव बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उंच विद्या विभूषित व्यक्ती होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणायचे ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ” एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन असून ज्ञान – ज्ञान शिवाय जगू शकत नाही शिक्षणाने माणसाला माणूसपण मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ग्रंथ वाचनाचा व ग्रंथ लेखनाचा छंद होता. त्यांचा ग्रंथ संग्रह खूप समृद्ध व वैविध्यपूर्ण होता. ते सतत वाचन करत असत या सततच्या वाचनामुळे पुस्तकाचा गाभा अचूक निवडण्याचे कसब त्यांना अवगत झाले होते. पुस्तकावर त्यांचे इतके प्रेम होते की रोज रात्री पहाट होईपर्यंत ते लेखन वाचन करण्यात मग्न असत. आवडलेले ग्रंथ घेताना प्रसंगी त्याने स्वतःच्या पोटाला ही चिमटा घेतला. सार्वजनिक ग्रंथालय नव्या जुन्या पुस्तकांची दुकाने अशा ठिकाणी ते तासंतास बसून ग्रंथ वाचीत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ प्रेम अशी तुल्यबळ अशा दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे त्यांची बहुआयामी बुद्धिमत्ता व दुसरी त्याग आणि समर्पण भावनेने त्यांनी उभारलेला सर्वाधिक समृद्ध असा खाजगी संग्रह होय. असे अनन्य साधारण व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय आपल्या जीवनात त्यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरु मंत्र त्यांनी समाजाला दिला. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तीन तत्त्वांच्या बळकट व न्यायपूर्ण तत्त्वावर उभे आहेत. शिकणे संघर्ष करणे आणि संघटना करणे ही त्यांची त्रिसूत्री आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते. आपण समाजाला काही देणे लागत असल्याची तळमळीची भावना अंगी असते. जीवनात त्यांनी जे उद्दिष्ट ठरवले त्यांच्या प्राप्तीसाठी जिवापाळ कष्ट करण्याची तयारी असते. त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा असते समाजात वावरताना समाजातील लोकांशी सहृदयतेने वागण्याची कला असते. आणि म्हणूनच ही माणसे मोठी होतात.
असेच आमचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महासागरातील एखाद्या दीपस्तंभ सारखे आहेत.
प्रा. रामेश्वर वसंत निंबाळकर
सहाय्यक प्राध्यापक
मलकापूर जि.बुलढाणा
मोबाईल नंबर 9689347220