खंडणी न दिल्यामुळे एकावर हल्ल्याचा प्रयत्न ; संशयिताला अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील बळीराम पेठ भागात ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या अशोक पाटील यांना वारंवार धमकावून खंडणी मागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित गोटया रविंद्र पाटील याने ऑटोरिक्षा भाड्याने करून देण्यास सांगून त्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,शहरातील दत्तात्रेय नगरात राहणारे अशोक पाटील यांचा बळीराम पेठेत ओम साईराम ट्रान्सपोर्टनावाने ऑफिस आहे. संशयित निर्भय उर्फ गोटया पाटील हा नेहमी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन दादागिरी करुन वेळोवेळी पैसे मागत होता. दरम्यान अशोक पाटील हे देखील त्याला पैसे देत वेळोवेळी मदत करत होते. बुधवार दि. १९ रोजी त्याने शिवजयंतीसाठी ऑटोरिक्षा करून देण्याची मागणी अशोक पाटील यांच्याकडे केली. पाटील यांनी त्याच्या ओळखीच्या चंद्रशेखर सुरेश कोळी यांची ऑटोरिक्षा भाड्याने करून दिली. मात्र, आरोपीने ऑटोरिक्षाचे आठशे रुपये भाडे देण्याचा आग्रह धरला. पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धमकावले. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संशयित गोटया पाटील हा ट्रान्सपोर्ट ऑफिस समोर आला. त्याने गटारीवरील लोखंडी जाळी फेकून दिली आणि येथे ट्रान्सपोर्ट चालू ठेवायचे नाही, असा दम दिला. त्यानंतर पुन्हा अकरा वाजता पाटील यांनी ऑफिसमध्ये जाऊन त्याला जाब विचारला असता.
व्यावसायीक अशोक पाटील यांनी आपल्या ओळखीच्या पोलिस कर्मचारी जितू पाटील यांना माहिती दिली. काही वेळाने आरोपी गोटया पाटील हा लोखंडी सुरा घेऊन पाटील व त्यांचा मुलगा राहुल पाटील यांच्या अंगावर धावून गेला. त्याचवेळी पोलिस हवालदार उमेश भांडारकर यांनी वेळीच पोहोचून आरोपीला निःशस्त्र केले आणि त्याच्या ताब्यातील सुरा काढून घेतला. झटापटीत आरोपीच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खंडणी आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.