खळबळजनक : एसटी बसमधून २२ तोळ्याचे दागिने लंपास !
पारोळा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एसटी बसमधून महिलेचे २२.५ तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चाळीसगाव ते पाचोराच्या दरम्यान घडली. यात पिंपळगाव हरे. पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शिंदाड येथील शोभा अरुण पाटील या दि. ९ रोजी लग्न सोहळा आटोपून दुपारी ३:४० वाजता चाळीसगावहून पाचोऱ्याकडे परत येत होत्या. नाशिक पाचोरा बस क्रमांक एम.एच. १९-१८८४ मध्ये चढल्यावर पर्समधील साडेबावीस तोळे सोने अज्ञातांनी लंपास केले. शोभा पाटील या सुनेसह नातवाला घेऊन पाचोरा स्थानकावर उतरल्या. त्यानंतर शिंदाड येथे घरी आल्यावर चोरीचा प्रकार समोर आला. त्यांनी पिंपळगाव हरे पोलिसात माहिती दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत. चाळीसगाव स्थानकात चढताना बसमध्ये गर्दी होती. त्याचा फायदा घेत ही चोरी झाल्याचा संशय आहे. पाटील या बसमध्ये बसल्यावर तीन महिला ‘आमची बस चुकली’ असे म्हणून तातडीने खाली उतरल्या होत्या. त्याच तीन महिलांनी दागिने लंपास केल्याचा संशय आहे