गव्हाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर केला रानडुकराने जीवघेणा हल्ला
एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गव्हाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या हिरामण हसरथ हटकर (६०, रा. पिंपळकोठा खुर्द) या शेतकऱ्यावर रानडुकराने जीवघेणा हल्ला केला. ही घटना पिंपळकोठा-रिंगणगाव रस्त्यावर ३ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
या हल्ल्यात हिरामण हटकर या शेतकऱ्याच्या दोन्ही पायांना चावा घेतला. त्यामुळे उजव्या पायाला १४ तर डाव्या पायाला १२ टाके पडले आहेत. त्यांना एरंडोल येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हिरामण हटकर हे ३ रोजी गव्हाला पाणी भरण्यासाठी गेले. ज्या भागात पाणी सोडायचे होते त्या ठिकाणी त्यांना गव्हाचे पीक आडवे पडलेले दिसले. ते जवळून पाहायला गेले असता लपून बसलेल्या रानडुकराने हटकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केला असता त्यांचा मुलगा प्रवीण धावत आला. तोवर रानडुकराने त्याच्यावरही हल्ला केला असता त्याने स्वतःचा बचाव केला. त्यावेळी रानडुक्कर शेजारच्या शेतात पळाले. त्या ठिकाणी प्रीतम हटकर (२३) याच्यावरसुद्धा रानडुकराने हल्ला चढवला. परिसरातील शेतकरी जमा झाल्यामुळे रानडुकराने पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या हटकर यांना एरंडोल येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन परिक्षेत्राचे अधिकारी डी. एस. पवार यांनी रुग्णालयात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याकडून घटनेची माहिती घेतली.