Monday, March 24, 2025
Homeजळगावगुरूंची प्रसन्नता अनुभवणे हीच मनुष्य जीवनातील सर्वोत्तम प्राप्ती- संतांचे प्रतिपादन

गुरूंची प्रसन्नता अनुभवणे हीच मनुष्य जीवनातील सर्वोत्तम प्राप्ती- संतांचे प्रतिपादन

गुरूंची प्रसन्नता अनुभवणे हीच मनुष्य जीवनातील सर्वोत्तम प्राप्ती- संतांचे प्रतिपादन
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

आपण केलेल्या कर्तृत्वाने गुरूंना प्रसन्नता लाभत असेल तर ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी यश प्राप्ती आहे. नामस्मरण हे या कलीयुगातील सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग असून आपल्या मनात परमेश्वराबद्दल आणि गुरूंबद्दल दासत्व भाव असल्यास गुरुकृपा झाल्याशिवाय राहत नाही. गुरूंची आठवण झाल्याने भगवंताचे स्मरण होते. कारण गुरुतत्त्व हे कायम आपल्या सोबत असते. त्यासाठी शिष्याची गुरुवर अपार श्रद्धा असणे गरजेचे आहे. पुण्यकर्माची आणि सत्कर्माची प्रेरणा देणारा दिवस म्हणजे पुण्यतिथी असे प्रतिपादन संतांनी आपल्या आशीर्वाचनातून सतपंथ संस्थान मंदिरचे ब्र. जगन्नाथ जी महाराज पुण्यतिथी महोत्सवात केली. सतपंथ संस्थान मंदिराचे अकरावे गादीपाती ब्रह्मलीन जगन्नाथ जी महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथी निमित्त सतपंथ संथान मंदिर व सतपंत चारिटेबल ट्रस्ट फैजपूरच्या वतीने पुण्यतिथी महोत्सवाचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते. १३ डिसेंबर रोजी पुण्यतिथीनिमित्त महापूजा व भजन संध्या आयोजित करण्यात आली होती तर १४ डिसेंबरला सकाळी भाव्य अशी शोभायात्रा काढून संस्थानच्या पूर्वाश्रमीच्या आचार्यांच्या (शेतातील ) समाधीस्थळापर्यंत हरिनामाचा गजर करीत व पारंपारिक वाद्यांच्या साथीने संत-महंत यांच्यासह शेकडो भाविक पोचले.

 


समाधी पूजनानंतर धर्मसभेचा प्रारंभ दीप प्रज्वलन आणि ब्र. जगन्नाथजी महाराज यांना अभिवादनाने करण्यात आला. स्वागत प्रवचनातून महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी माझ्यावर लहानपणापासून गुरुदेवांनी केलेले संस्कार, शिकवणूक व अपार प्रेम याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आध्यात्मिक कार्य यथायोग्य पद्धतीने पुढे नेण्याचा संकल्प केला. व्यासपीठावर उपस्थित सर्व संत महंतांचे सतपंथ संस्थानच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज वृंदावन धाम पाल, आचार्य मानेकर बाबा शास्त्री दत्त मंदिर सावदा, श्री श्याम चैतन्यजी महाराज जामनेर, परमपूज्य योगी दत्तनाथ जी महाराज शिंदखेडा, आचार्य सचिनजी पाटील, ह भ प रवींद्र महाराज हरणे मुक्ताईनगर, गेंदालाल जी महाराज भुसावळ, ह भ प धनराज जी महाराज अंजाळेकर, स.गु शास्त्री अनंतप्रकाशदासजी महाराज स्वामीनारायण मंदिर सावदा, श्री महंत पवनकुमारदासजी महाराज खंडोबा वाडी फैजपूर, श्री प्रवीणदासजी महाराज संत श्री खुशाल महाराज संस्थान फैजपूर यांनी उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन केले. सदर महोत्सवास लोकप्रतिनिधी नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ जावळे यांची उपस्थिती होती. सर्व संत महंतांच्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान करण्यात आला. व त्यांच्याकडून अधिकाधिक उत्तम सामाजिक कार्य होईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर नरेंद्र नारखेडे, डॉ. केतकी पाटील, विनोदभाऊ सोनवणे, चंदन कोल्हे यांचीही उपस्थिती होती. दरवर्षाप्रमाणे यावर्षी महोत्सवामध्ये विशेष सन्मान करण्यात आला. सतपंथ मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या श्रीमती बेबीताई रेवा भारंबे यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन कृतज्ञतापूर्वक गौरविण्यात आले. महोत्सवाच्या निमित्ताने सतपंथ प्रकाशनाने प्रकाशित केलेले सतपंथ दिनदर्शिकेचे प्रकाशनही उपस्थित संतांच्या हस्ते करण्यात आले. सतपंथ चारिटेबल ट्रस्ट संचलित तुलसी हेल्थ केअरने निर्माण केलेली तुलसी कांस्ययंत्र या उत्पादनाचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या भक्ती भावाने व आनंदाने शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या