गेल्या वर्षी शासकीय पगार घेणाऱ्या ६० लाचखोरांवर कारवाई केली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने!
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – सन २०२४ मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून एकूण ३७ सापळा कारवाई करण्यात आली यात एकूण ६० शासकीय अधिकारी कर्मचारी असलेल्या आरोपींना अटक करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक जळगाव येथील अँटी करप्शन ब्युरो पोलीस उपअधीक्षक योगेश जी ठाकूर यांनी दिले आहे.
दि. १ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की एकूण ६० आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे यात जळगाव घटकाकडील वर्ग १ चे ४, वर्ग २ चे १ , वर्ग ३ चे ३०, वर्ग ४ चे ६ व इतर ६ व खाजगी इसम १३ यांचा समावेश आहे. सन २०२४ मध्ये जळगाव वटकाकडून विविध विभागावर कारवाई करण्यात आलेली असून वर्षभरात महसूल विभागात ७ कारवाई मध्ये ११ आरोपी, जिल्हा परिषद विभागात ७ कारवाईत १४ आरोपी, पोलीस विभागात ५ कारवाईत ८ आरोपी, वीज वितरण विभागात ४ कारवाईत ८ आरोपी, उद्योग ऊर्जा व कामगार विभागात २ कारवाईत २ आरोपी, शिक्षण विभागात २ कारवाईत २ आरोपी, सरपंच २ कारवाईत ५ आरोपी, व इतर लोकसेवक २ कारवाईत २ आरोपी, खाजगी २ कारवाईत २ आरोपी,आर.टी.ओ. विभागात १ कारवाईत २ आरोपी, दारूबंदी विभाग १ कारवाईत २ आरोपी, म.न.पा. विभागात १ कारवाईत १ आरोपी,बी.एच.आर. पतसंस्था १ कारवाईत २ आरोपी, अशा विविध विभागात कारवाई केली आहे अशा प्रकारे एकूण ३७ सापळा कारवाई मध्ये ६० आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सन २०२३ मध्ये ३२ गुन्ह्यात ५१ आरोपीतांवर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली असून सन २०२४ मध्ये ३७ गुन्ह्यामध्ये ६० आरोपीतावर कारवाई करण्यात आली आहे, सन २०२३ च्या तुलनेत सन २०२४ मध्ये अधिक ५ ने वाढ झाली आहे.सदरची कारवाई मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक. परिक्षेत्र नाशिक, यांचे मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव घटकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिट तर्फे नागरिकांना आवाहान करण्यात आले आहे की कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव कार्यालयाशी संपर्क साधून निर्भीडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंद करावी.
कार्यालयीन वेळेनंतर व सुट्टीचे दिवशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्य प्रणाली बाबत व तक्रारीबाबत माहिती पाहिजे असल्यास खालील नमूद मोबाईल क्रमांकवर दूरध्वनीवर संपर्क साधावा. महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोयीच्या दृष्टीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासाठी लँडलाईन ते लँडलाईन व मोबाईलचे लँडलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरू करण्यात आली असून सदर क्रमांकावर लाच लुचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली व संबंधि व करावयाच्या तक्रारी संबंधि नागरिकांनी खालील नमूद क्रमांकावर संपर्क साधावा.पोलीस उपअधीक्षक श्री योगेश गंगाधर ठाकूर मोबाईल क्रमांक ९७०२४३ ३१३१ लँडलाईन क्रमांक ०२५७ २२३५४७७ , टोल फ्री क्रमांक १०६४ आहे.
अशाप्रकारे कारवाई झालेली असली तरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आयकर विभागामार्फत काही ठराविक विभागातील ठराविक शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या वार्षिक विवरण पत्रात नमूद केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी व प्रत्यक्ष सुरू असलेल्या व्यवहारांची ( कौटुंबिक व जवळच्या काही नातेवाईकांना आर्थिक सहकार्य केले आहे किंवा कसे..? ) सखोल चौकशी केल्यास फार मोठे घबाड सापडल्याशिवाय राहणार नाही अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा आहे.