घरफोडी करणाऱ्या दोघं टोळ्यांचा पर्दाफाश ; टोळीतील मुख्य संशयिताला अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील अनेक ठिकाणी घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. रामानंद नगर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश करीत आठ गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये गेल्या वर्षीचे चार आणि नवीन वर्षातील चार अशा आठ गुन्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, चोरट्यांकडून १० तोळे सोने, ६५० ग्रॅम चांदी असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाबळ परिसरात बंद घरांमध्ये चोरी होत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रामानंद नगर पोलिसांकडून हद्दीत दिवसरात्र गस्त घालून संशयितांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, महाबळ परिसरात सागर शिवराम डोईफोडे हा सराईत गुन्हेगार घरफोडी करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने टोळीतील मुख्य संशयित सागर डोईफोडे याच्या मुसक्या आवळल्या.
संशयित सागर डोईफोडे याला ताब्यात घेत त्याची, कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने आपण सहा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून घरफोडी करुन चोरलेले शंभर ग्रॅम सोने आणि ६५० ग्रॅम चांदी असा एकूण ८ लाख रुपयांचा पोलिसांनी हस्तगत केला. त्याचे दोन साथीदार फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील सपोनि विठ्ठल पाटील, सफौ संजय सपकाळे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, इरफान मलिक, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, उमेश पवार यांच्या पथकाने केली.