घरात घुसून मोबाईलसह रोकड लंपास !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरुन रविना रमेश सोनवणे (वय ३०, रा. शिवाजी नगर हुडको) यांचे दोन मोबाईल आणि पर्समधून दहा हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना दि. १७ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगर हुडकोमध्ये रविना रमेश सोनवणे या भाऊ, आई, मुली सोबत वास्तवयास असून त्या एमआयडीसीतील कंपनीमध्ये कामाला आहेत. दि. १६ रोजी रात्री त्या घराचा दरवाजा लोटून कुटुंबियांसह गप्पा मारत बसले होते. त्यानंतर घरातील सर्वजण झोपून गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्याठिकाणाहून चोरट्याने रविना यांच्या पर्समधून दहा हजारांची रोकड व १३ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरुन नेले. पहाटे सहा वाजेच्या सुमारास रविना सोनवणे यांना जाग आल्याने त्यांना घरात ठेवलेले मोबाईल आणि पर्समधील पैसे दिसून आले नाही. त्यामुळे घरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.