चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये चोरी करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चौधरी टोयाटो व सातपुडा ऑटोमोबाईल या चारचाकी वाहनाच्या शोरुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी मध्यप्रदेशातील तीन जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव ते भुसावळ दरम्यान तरसोद फाट्यासमोर असलेल्या चौधरी टोयाटो सातपुडा ऑटोमोबाईल या चारचाकी वाहनाच्या शोरुममध्ये गेल्या महिन्यात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली होती. यात चोरट्यांच्या हाती जास्त मुद्देमाल लागला नव्हता, मात्र शोरुममध्ये तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान ही चोरी मध्यप्रदेशातील चोरट्यांनी केल्याची माहिती सपोनि ए.सी. मनोरे यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार मेवालाल पिसीलाल मोहिते (वय ३३, रा. बोरगाव, मध्यप्रदेश), कमलेश उर्फ कालू मन्नलाल पवार (वय ४०, रा. रोसिया, जि. खंडवा, मध्यप्रदेश), अजय धुलजी चव्हाण (वय २२, रा. घटिया गराठे, मनसौर, मध्यप्रदेश) या तीन जणांना पोहेकॉ योगेश वराडे, युनूस शेख, गिरीश शिंदे, पोकॉ आरिफ तडवी या पथकाने खंडवा येथून अटक केले.