चोरट्यांचा धुमाकूळ : दोन कंपनीतून लाखोंची रोकड लंपास; चोरटे सीसीटव्हीत कैद !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत एमआयडीसीमधील ई सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन या कंपनीतून तीन लाख तर आर.जी. इंटरप्रायझेस या कंपनीतून १ लाख ८ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दोन्ही कंपनीत चोरी करतांना तीन चोरटे सीसीटव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या ई सेक्टरमध्ये जिग्नेश शरद शेठ (वय ४५) यांची ग्रीन एन इको सोल्युशन ही कंपनी आहे. शुक्रवार दि. २१ रोजी त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असल्याने ते वरील माळ्यावर असलेल्या घरात एकटेच झोपलेले होते. पहाटे २ वाजेच्या सुमारास ३ चोरट्यांनी कंपनीचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि कार्यालयातील कपाटामधील असलेली ३ लाखांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीत काम करणारे कामगार हे आले असता, त्यांना कंपनीचे शटर वाकलेले दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती लागलीच जिग्नेश शेठ यांना दिली. त्यानंतर कंपनीत जावून बघितले असता, चोरट्यांनी कंपनीतील सामान अस्ताव्यस्त फेकलेला त्यांना दिसून आला. दोन्ही कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे पहाटे २.२० ते ३.३० वाजेच्या दरम्यान चोरी करताना दिसत आहेत. दोन्ही कंपन्यांमधील चोरीचा प्रकार सारखाच असल्याने, एकाच टोळीने दोन्ही ठिकाणी चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. तिघे चोरटे हाफ चड्डी घालून आणि चेहऱ्याला मोठा रुमाल बांधून आलेले होते. हे फुटेज पोलिसांनी जप्त केले असून त्यानुसार तपास केला जात आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत, त्याच परिसरातील पंकज गुणवंत टोगळे यांच्या आर. जी. इंटरप्रायझेस या कंपनीतही चोरी झाली आहे. टोगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीतून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास १ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेतही तीन अज्ञात चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करताना कैद झाले आहेत. एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही घटनांची नोंद करून तपास सुरू केला आहे.