चोरट्यांचा धुमाकूळ : बंद पापड कंपनीचे तोडले कुलूप !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बंद असलेल्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीचा पापड मसाला चोरून नेला. ही घटना २४ ते २६ मार्चदरम्यान औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी बाहेर डीपी बंद करीत वीजपुरवठा खंडित केला व त्यानंतर चोरी केल्याचे समोर आले आहे. अतुल विश्वनाथ मुळे (५९, रा. मोहाडी रोड) यांचा मसाल्याचा व्यवसाय असून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे ते स्टॉकीस्ट आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये त्यांचे श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाचे गोदाम आहे. त्यात ते पापड मसाल्यासह इतरही मसाले ठेवतात. २४ ते २६ मार्चदरम्यान या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी गोदामातून आठ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीच्या पापड मसाल्याच्या पुड्या असलेल्या ७१ गोण्या चोरून नेल्या. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यात तीन जण चोरी करताना दिसत आहेत. या गोदामामध्ये १० प्रकारचे मसाले ठेवलेले असतात. त्यात ज्यांची किंमत जास्त आहे, असेच मसाले चोरट्यांनी लांबविले आहे.
ही चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी गोदामाजवळ येऊन वीजपुरवठा खंडित केला व अंधारामध्ये त्यांनी चोरी केली. औद्योगिक वसाहत परिसरात कंपनी, गोदामांमध्ये अधून-मधून चोरीच्या घटना सुरूच आहे. त्यात आता तर चोरट्यांची एवढी हिंमत वाढली आहे की, मालवाहू वाहन लावून माल चोरून नेला आहे.