जळगावातील आरटीओ अधिकारी दीपक पाटील यांना ३ लाखांची लाच भोवली ; पंटर एसीबीच्या जाळ्यात !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आपल्याच विभागातील निरिक्षक यांच्या कडून बदली करण्याचा मोबदला म्हणून तीन लाखांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारल्यानंतर जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह एका खासगी पंटरास छत्रपती संभाजी नगर एसीबीच्या पथकाने अटक केल्याने प्रादेशिक परिवहन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.दीपक अण्णा पाटील वय 56 असे अटकेतील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे तर भिकन मुकुंद भावे (52, रा.आदर्श नगर प्लॉट, नं. 98, जळगाव) असे खाजगी पंटराचे नाव आहे.
या घटनेतील 55 वर्षीय तक्रारदार हे देखील आरटीओ अधिकारी असून त्यांची नोव्हेंबर महिन्यात नवापूर चेक पोस्टवर बदली करण्यात आल्यानंतर त्या मोबदल्यात जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भिकन भावे नावाच्या खाजगी पंटराच्या माध्यमातून 4 नोव्हेंबर रोजी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती.मात्र अधिकाऱ्यास लाच द्यावयाची नसल्याने अधिकाऱ्याने छत्रपती संभाजीनगर विभागीय लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. तक्रारदाराकडून भावे यांनी मेहरूण तलावाजवळील लेक अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी लाच रक्कम स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व नंतर प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
दोघा आरोपींविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांच्या कोल्हापूर, ठाणे, सांगली, नगर येथील घरांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली असून त्यात काय सापडले याची माहिती अध्याप प्राप्त झाली नाही.पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल धस, हवालदार अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, विलास चव्हाण सचिन बारसे, सी. एन. बागुल आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.या घटनेने प्रादेशिक परिवहन विभागात खळबळ उडाली आहे .