जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील एसटी वर्कशॉप समोरील कुशन व रेक्झीनच्या गोडावूनसह बाजूची दोन दुकानांना भीषण आग लागल्याने लाखो रूपयांचा समान जळून खाक झाला. ही घटना बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, आगीत दुकानाच्या बाहेर लावलेली चारचाकी वाहन देखील जळून खाक झाले असून अग्निशमन विभागाच्या सहा बंबांनी आग आटोक्यात आणली. शहरातील सालार नगरातील शेख साबीर इस्लाम (वय ४५) यांचे एसटी वर्कशॉपच्या समोर कुशन व रेक्झीनचे गोडावून आहे. बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कुशन व रेक्झीनने पेट घेतल्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. त्यामुळे ही आग परत जावून गोडावुनच्या शेजारी असलेल्या सुधीरचंद मन्ना यांच्या गॅरेज आणि अशोक गुलाब महाजन या चहा विक्रेत्याचे दुकान देखील आगीने आपल्या विळख्यात घेतले. या आगीची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल होवून त्यांनी आग विझविण्यास सुरुवात केली. या आगीत दुकानांच्या बाहेर लावण्यात आलेली चारचाकी कार क्रमांक (एमएच ०४ इएच ७०१४) याचे देखील जळून नुकसान झाले आहे.
घटनास्थळी मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजीत घरडे, गिरीश खडके, वाहनचालक देविदास सुरवाडे , इकबाल तडवी, महेश पाटील, भगवान पाटील, रोहिदास चौधरी, तेजस जोशी, लेडीज फायरमन भाग्यश्री बाविस्कर, विजय पाटील, ) मनोज पाटील, सरदार पाटील , जगदीश साळुंखे, पन्नालाल सोनवणे, योगेश कोल्हे, नंदकिशोर खडके, निवांत इंगळे, संजय भोईटे, संतोष तायडे, भारत छापरिया यांच्या पथकाने सहा अग्निशमन बंबाने ही आग विझविण्यात आली. कुशन व रेक्झीनच्या दुकानाला शॉर्टसर्कीट मुळे आग लागल्याचा अंदाज उपस्थितांकडून वर्तविण्यात आला होता. आगीमुळे तीन्ही दुकानांमधील संपुर्ण साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते