जळगावात कर्जदार व वसूलीसाठी आलेल्या पथकामध्ये वाद !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – खामगाव अर्बन को-ऑप. बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेचे अधिकारी आणि मुंबई येथील वसुली पथक जप्तीची कारवाई करण्यासाठी शहरातील ईच्छा देवी चौकातील ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात आले. त्याठिकाणी कर्जदार आणि बँकेच्या अधिकारी व पथकासोबत वाद झाला.
यावेळी कर्ज न फेडल्यामुळे कारवाई केली जात असल्याचे पथकाचे म्हणणे होते तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी कमिशन घेऊन मुलाला कर्ज दिल्याचा आरोप व्यावसायिक खुबचंद साहित्या यांनी केला आहे.खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून घेतलेले कर्ज थकल्याने या थकीत कर्जाच्या वसुलीचा वाद आहे. कर्ज भरले जात नसल्याने बँकेचे अधिकारी पोलिस बंदोबस्तासह बुधवार दि. ५ फेब्रुवारी रोजी शहरातील ईच्छा देवी चौकात ट्रॅव्हल्सचे कार्यालय सुरू असलेल्या गाळ्यात पोहचले. याठिकाणी जप्तीची कारवाई करण्यासाठी हे पथक आले असताना खुबचंद साहित्या यांनी बँकेच्या कारभाराचा पाढा वाचला. वसुली पथकाशी वाद होऊन जप्तीवरून जोरदार खडाजंगी झाली. मुलगा नितीन साहित्या यांना सदर बँकेच्या अधिकाऱ्यांनी कमिशन घेऊन मोठ्या प्रमाणात कर्ज दिले असून एवढे कर्ज कसे काय दिले जाऊ शकते, असा सवाल खुबचंद साहित्या यांनी केला.दिलेल्या कर्जापोटी बँकेकडे हॉटेल के.पी. प्राईडचा काही हिस्सा मॉर्गेज आहे. तसेच ईच्छादेवी चौकातील गाळ्यावरही बँकेने बोझा लावला असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉटेलवरील कर्जाचा विषय मार्गी लावून माझ्या मुलाला यातून मुक्त करावे, त्यासाठी मी तयार असून माझे काही म्हणणे नाही असे सांगत अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. वसुली प्रक्रिया नियमांनुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पार पडत असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बँकेच्या म्हणण्यानुसार, संबंधित कर्जदारांनी वेळेत हप्ते भरले नसल्याने ही कारवाई करावी लागली असल्याचे त्यांनी सांगितले.