जळगाव प्राणघातक हल्ला प्रकरण : मुख्य संशयितास अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून सुटताच प्रतीक हरिदास निंबाळकर (वय २४, रा. इंद्रप्रस्थनगर) याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या देविदास उर्फ आबा रामदास सैंदाणे (वय ४५, रा. सीतासोनू नगर) या मुख्य संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मुसक्या आवळल्या. यातील दोन जण अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,खूनाच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या प्रतिक निंबाळकर याचा शुक्रवारी जामीन झाला. त्याला घेवून त्याचा भाऊ आणि वडील घरी येत असतांना, त्यांच्या दुचाकीला धडक देत त्यांना खाली पाडले. त्यानंतर तीन जणांनी प्रतिक निंबाळकर याच्यावर लोखंडी टॉमीने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी यांनी मारेकऱ्यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कडक तंबी दिली होती. त्यानुसार संशयितांच्या शोधार्थ पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी अनिल भवारी यांच्यासह एलसीबीचे वेगवेगळे पथके तयार केली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, राहूल पाटील यांच्या पथकाने प्राणघातक हल्ल्यातील मुख्य संशयित देविदास उर्फ आबा सैंदाणे याच्या मुसक्या आवळल्या. त्याला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेत सैंदाणे याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला शासकीय रुग्णालयातील कैदी वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.