Thursday, March 27, 2025
Homeजळगावज्ञानेश्वरीतून सामाजिक व भाषिक आविष्काराचे दर्शन

ज्ञानेश्वरीतून सामाजिक व भाषिक आविष्काराचे दर्शन

ज्ञानेश्वरीतून सामाजिक व भाषिक आविष्काराचे दर्शन

श्री गुरूदेव ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या मासिक सभेत डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन

भुसावळ – आपली मराठी भाषा ही मधुर, प्रासादिक व श्रीमंत असून तिला अधिकाधिक समृद्ध करण्याचे काम संतांनी केलेले आहे. विविध साहित्यरचनेच्या माध्यमातून संतांनी मराठी भाषा संवर्धनात मोलाचे योगदान दिले आहे. संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर टीका करताना ज्ञानेश्वरीतून सामाजिक व भाषिक आविष्काराचे दर्शन घडवले असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांनी येथे केले.

भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात आयोजित श्री गुरूदेव ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या मासिक सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आर. एल. पाटील व महादेव हरिमकर होते. प्रारंभी श्री गुरूदेव दत्तप्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महादेव हरिमकर यांनी प्रास्ताविक करून डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय करून दिला. माळजप भानुदास बऱ्हाटे यांनी केली. मराठी भाषा संवर्धनात संतांचे योगदान या विषयावर बोलताना डॉ. जगदीश पाटील यांनी भावसमृद्ध असलेल्या मराठी भाषेला अधिकाधिक समृद्ध करण्याचे काम संतांनी केले असल्याचे विविध उदाहरणातून सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत आदिशक्ती मुक्ताई यासह इतर संतांनी आपल्या साहित्य निर्मितीतून मराठी भाषा प्रगल्भ केली आहे. त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत तर सगळेच विषय आलेले आहेत. त्याचप्रमाणे मातृभाषा हे प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक असल्याने मातृभाषेचे अनन्यसाधारण महत्व असल्याचेही डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगत आर. एल. पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन महादेव हरिमकर यांनी तर आभार गवळी सर यांनी मानले. यावेळी प्रकाश तायडे, रमाकांत पाटील, अनिल बऱ्हाटे, एस. एस. कुरकुरे, पुरुषोत्तम मेंडकी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या