डॉक्टर पालकाचीच साडेसात लाखांत फसवणूक ; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुलगा डॉक्टर व्हावा, यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर पालकाचीच साडेसात लाखांत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फत्तेपूर (ता. जामनेर) पोलिसांत महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, फिर्यादी हे जामनेर तालुक्यात डॉक्टर आहेत. मुलगा डॉक्टर व्हावा या अपेक्षेने त्यांनी त्यांच्या अंबरनाथ येथील मित्राशी संपर्क साधला. या मित्राने त्यांना महेश शांताराम वाघमारे (नवी मुंबई) व राहुल शर्मा (रा. गाझियाबाद) यांचे संपर्क क्रमांक दिले. त्यांच्याशी संपर्क केल्यावर वाघमारे याने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी नवी मुंबईतील कार्यालयात बोलावून शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट यासाठी २ लाख रोख घेतले. कोणतीही पावती न देता इन्व्हीटेशन पत्र दिले. या पत्रासाठी ४ डिसेंबरला २० हजार, व्हिसा मिळविण्यासाठी ६० हजार दिले. त्यानंतर बायोमेट्रिक थंबसाठी वाघमारे यास ३० हजार रोख दिले. १८ डिसेंबरला शर्मा याने फिर्यादीकडून शिक्षण शुल्क व वसतिगृहासाठी ३ लाख ७० हजार त्यांच्या नातेवाईक महिलेला देण्याचे सांगितले. यानंतर फिर्यादी यांचा मुलगा युक्रेनला शिक्षणासाठी जात होता. जाण्यापूर्वी शर्मा याने ५० हजार रुपये घेतले. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलगा युक्रेनला पोहोचला.
परंतु संशयितांनी दिलेले पैसे न भरल्याने तसेच युद्ध सुरू असल्याने फिर्यादी यांनी त्याला माघारी बोलाविले. यानंतर त्यांनी तिन्ही संशयितांकडे रक्कम मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व फोन उचलणे टाळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फत्तेपूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.