तब्बल २ कोटी ७२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवत सुरुवातीला एक हजार रुपयांचा मोबदला दिला. त्यातून विश्वास संपादन करीत नंतर मात्र खासगी ठेकेदाराची तब्बल दोन कोटी ७२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २६ जून ते २६ नोव्हेंबर दरम्यान घडला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमळनेर येथील खासगी ठेकेदाराला एका व्हॉटस् अॅप ग्रुपमध्ये अजय गर्ग नामक व्यक्तीने अॅड केले. त्यानंतर या ग्रुपमधील रितू वोरा नामक व्यक्तीने लिंक पाठविली. एका अॅप्लिकेशनद्वारे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार ठेकेदाराने अॅप्लिकेशन डाउनलोड केले.शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफ्याचे आमिष दाखविल्यानंतर या ठेकेदाराने काही रक्कम गुंतविली. त्यावर एक हजार रुपये नफा म्हणून त्यांच्या खात्यावर जमा केला. त्यातून विश्वास संपादन करीत त्यांना अधिकची रक्कम गुंतविण्यास सांगितली. मात्र नंतर ते रक्कम गुंतवत गेले, मात्र त्यांना कोणताही नफा दिला नाही की मुद्दलही परत दिली नाही.
२६ जूनपासून ठेकेदाराच्या संपर्कात असलेल्या सायबर ठगांनी त्यांना रक्कम गुंतविण्यास सांगितली. ते त्या पद्धतीने रक्कम गुंतवत गेले. तब्बल पाच महिने हा प्रकार सुरू होता. मात्र, नंतर कोणताही मोबदला मिळत नव्हता. या पाच महिन्यांत वेळोवेळी ठेकेदाराने रक्कम गुंतविल्याने त्यांच्या हातची दोन कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम गेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.