तहसीलदारांची मध्यरात्री धडक कारवाई ; वाळूचे ट्रॅक्टर पकडले !
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून तस्करी करत असलेल्या वाळू – माफियांवर महसूलच्या पथकाने धडक कारवाई करत तीन ट्रॅक्टर पकडले. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांच्या नेतृत्वात महसूल विभागाचे पथक वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी गस्त घालत असताना रिगाव येथून सुलेमार्गे वढोदा येथे वाळूची वाहतूक करत असलेले तीन ट्रॅक्टर त्यांच्या नजरेस पडले. यावेळी पथकाने त्यांना अडवले असता ट्रॅक्टर चालक पळून गेले. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील यांना माहिती देऊन पोलिस सहकार्य मागितले. त्यानुसार कुऱ्हा पोलिस चौकीचे सहायक फौजदार संतोष चौधरी, पोलिस नाईक हरीश गवळी, पो.कॉ. अंकुश बावस्कर, पो. कॉ. अनिल देवरे यांनी घटनास्थळी जाऊन तिन्ही ट्रॅक्टर कुऱ्हा पोलिस चौकीत आणले.
तपासणी केली असता वर्षा ईश्वर भोंगरे, रा. निमखेडी बु. यांचे मालकीचे एक व गणेश रमेश बेलदार, रा. रिगाव यांचे मालकीचे दोन असे तीन ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्याने हे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. पथकात तलाठी काळे, खैरनार, बोराटकर, सोनवणे, अमित इंगळे, वैभव काकडे, महसूल सहायक प्रशांत सावकारे, किरण बावस्कर यांचा समावेश होता. जप्त केलेल्या ट्रॅक्टर मालकांविरुद्ध प्रत्येकी एक लाख बारा हजारांचा दंड प्रस्तावित केला आहे.