तहसीलदार बनावट स्वाक्षरी प्रकरण : स्वाक्षरीचे नमुने छत्रपती संभाजीनगरात पाठवणार !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करुन बोगस आदेश तयार करणारा मुख्य सूत्रधार अॅड. शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस बागवान व अॅड. शेख मोहसीन शेख सादीक मन्यार या दोघांना अटक करण्यात आली आहे. आदेशावर तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करणाऱ्या अॅड. शेख मो. रईस बागवान यांच्या अक्षरासह त्याच्या स्वाक्षरीचे नमुने घेण्यात आले आहे. ते नमुने छत्रपती संभाजीनगर येथील वादग्रस्त दस्ताऐवज पडताळणी विभागात पाठविण्यात येणार आहे.
जन्म दाखल्यांसाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने बोगस आदेश प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून याप्रकरणी ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करतांना सुरुवातीला प्रकरणे दाखल असलेल्या अर्जदार हे बांग्लादेशी आहेत की, भारतीय याची पडताळणीसाठी त्यांची भारतीयत्व असल्याची कागदपत्रे सादर करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास वेगवेगळ्या दिशेने केला जात आहे. दरम्यान, तहसीलदारांचे बनावट आदेश तयार करुन त्यावर त्यांचा शिक्का मारणारा मुख्य संशयित अॅड. शेख मो. रईस बागवान याच्यासह त्याचा साथीदार एजंट अॅड. शेख मोहसीन मन्यार या दोघांना अटक करण्यात आली होती.