दारु पिण्यास पैसे न दिल्याने दूध संघाच्या सुरक्षा रक्षकाच्या कॅबीनमध्ये तोडफोड ; गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सुरक्षा अधिकाऱ्याने दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून जिल्हा दूध संघातील सुरक्षा रक्षक कॅबिनमध्ये घुसून आकाश राजू खरे (वय २८, रा. पिंप्राळा हुडको) याने तोडफोड केली. ही घटना दि. २० मार्च रोजी रात्री घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा दूध संघात सुरक्षा अधिकारी म्हणून डी. के पाटील हे नोकरीस आहे. दूध संघात त्यांची कॅबीन असून दि. २० रोजी रात्री आकाश खरे हा जिल्हा दूध संघातील सुरक्षा रक्षक कॅबिनमध्ये आला व सुरक्षा अधिकारी डी. के. पाटील यांनी मला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्यांचे नाव घेत शिवीगाळ करू लागला. या वेळी त्याने त्याचा मोबाईल टेबलावरील काचावर मारून तो फोडला. फोडलेला काच घेऊन त्याने सुरक्षा रक्षक सुपरवायझरला जिवे ठार मारण्याची घमकी दिली.
या प्रकरणी सुपरवायझर ईश्वर ओंकार पाटील (वय ४७, रा. दादावाडी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आकाश खरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे करीत आहेत.