धक्कादायक : आधी मुलाची केली हत्या नंतर बापाने संपविले आयुष्य !
एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने त्याचा गळा आवळून खून करत स्वतःही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना एरंडोल येथे गुरुवारी उघडकीस आली. बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवर त्यांनी मुलाचा खून करून तो पुरल्याची माहिती दिली. मुलगा सोशल मीडियावर रिल्स बनवायचा. विठ्ठल पाटील ५०) आणि हितेश पाटील (२२) अशी या मृत बाप-बेट्यांची नावे आहेत.
माजी सैनिक विठ्ठल पाटील हे भवरखेडा (ता. एरंडोल) येथील मूळ रहिवासी असून ते आपल्या परिवारासह एरंडोल येथील वृंदावन नगरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील हा रिल्स बनवायचा. मात्र, तो वडिलांपासून वेगळा राहत होता. तो वडिलांचा छळ करून मारहाण करत होता. या प्रकाराला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करत स्वतः ही आत्महत्या केली.विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात हितेश हा दारू पिऊन आपणास मारहाण करत होता. त्यास कंटाळून भवरखेडा गावानजीकच्या एका नाल्याजवळ त्याचा खून केला व मृतदेह जमिनीत पुरला आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आढळले. गुरुवारी हितेश पाटील याचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळून आला. तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी सुती दोरी आढळून आली. या दोरीनेच विठ्ठल पाटील यांनी मुलाला फाशी दिली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.