धक्कादायक : घर खाली केल्याचा वाद : घरमालकाच्या पोटात खुपसला चाकू !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भाडेतत्वावर दिलेले घर खाली करून घेतल्याने त्याचा जाब विचारत घरमालक गलू पुजो पाटील यांच्या पोटात चाकू खूपसून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना दि. १४ मार्च रोजी नशिराबाद येथे घडली. या प्रकरणी प्रमोद नामदेव पाटील (४५, रा. नशिराबाद) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, नशिराबाद गावात राहणारे गलू पाटील यांनी त्यांचे घर भाडेतत्वाने दिलेले होते. ते घर त्यांनी भाडेकरूकडून खाली करून घेतले. त्याविषयी भाडेकरू प्रमोद पाटील यांनी विचारणा केली. त्यावर आम्हाला येथे राहण्यासाठी यायचे असल्याने घर खाली करू घेतल्याचे घरमालकाने सांगितले. त्याचा राग आल्याने पाटील याने गलू पाटील यांना मारहाण करीत त्यांच्या पोटात चाकू खुपसला. या प्राणघातक हल्ल्यात घरमालक गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी जखमीचा मुलगा विपूल गलू पाटील (३८, रा. नशिराबाद) यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रमोद पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि ए.सी. मनोरे करीत आहेत.