धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन प्रकरणी मनमाड रेल्वे स्थानकाचे ऑन ड्युटी TTE तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी :- गोरखपूर ते “सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनल, बेंगलुरु” (SMVT) बंगळुरू स्पेशल ट्रेन (06530) मधील ऑन ड्युटी TTE तिवारी यांच्यावर महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलीस स्टेशन, मनमाड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की फिर्यादी (वय 19), रहिवासी कानपूर, सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती 22 मार्च रोजी कानपूरहून पुण्याला जाणाऱ्या 06530 SMVT बंगळुरू स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास करत होती. तिचे तिकीट RAC असल्याने तिने TTE तिवारी यांच्याकडे सीट उपलब्धतेबाबत विचारणा केली. सुरुवातीला तिला B-4 कोचमध्ये बसण्यास सांगण्यात आले, मात्र नंतर तिला A-1 कोचमध्ये 05 नंबर सीट दिली.तक्रारीनुसार, TTE तिवारी वारंवार तिच्या सीटवर येऊन बसले आणि तिला झोपण्यास सांगितले. काही वेळानंतर त्यांनी तिला अयोग्य प्रकारे स्पर्श केला. सुरुवातीला चुकून झाल्याचे समजून तिने दुर्लक्ष केले, मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा तिच्या जवळ येऊन बॅड टच केला. घाबरून ती वॉशरूममध्ये 20-25 मिनिटे बसून राहिली. बाहेर आल्यानंतर तिला TTE तिवारी वॉशरूमच्या बाहेर उभे असलेले दिसले, यामुळे तिला भीती वाटली.
ही संपूर्ण घटना फिर्यादीने तिच्या वडिलांना फोनवर सांगितली. रेल्वे स्थानक भुसावळ येण्याच्या काही वेळ आधीपर्यंत TTE तिवारी यांनी तिचा पाठलाग करत राहून सतत गैरवर्तन केले. या प्रकरणी फिर्यादीने मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि लोहामार्ग पोलिसांनी सतर्कता दाखवत पुढील कारवाई सुरू केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत अशा घटना अत्यंत गंभीर असल्याने आरोपीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.