धावत्या बसमधून सोने लांबविणाऱ्या दोघा महिलांना अटक !
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – धावत्या बसमधून १ तोळे सोने लांबविणाऱ्या यवतमाळ येथील दोन महिलांना अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाठलाग पोलिसांनी केला. गंगा चैना हातगडे (४०) आणि गंगा सुभाष नाडे (४५, दोन्ही रा. नेताजीनगर, यवतमाळ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा जिजाबराव पाटील (४८, रा. गारखेडा ता. धरणगाव) ही महिला शिंदखेडा तालुक्यात लग्न समारंभासाठी धरणगावहून जळगाव दोंडाईचा बसमधून प्रवास करीत होती.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दुपारी दोन वाजेच्या सुमारास पैलाड नाक्यावर तिच्या शेजारी बसलेल्या दोन महिला उतरल्या. महिलेने आपल्या पिशवीतील पर्स मध्ये असलेले दागिने तपासले असता ते गायब झाल्याचे आढळले. महिलेने अमळनेर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी जळगाव, कुसुंबा आणि अकोला, परतवाडा, अंजनगाव, इंदूर येथे तपास सुरु केला. शेवटी या महिला वरुड ता. अमरावती येथे आढळून आल्या.या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात दिवस एकाच कपड्यावर मिळेल तसे जेवण करून जंग जंग पछाडले होते. एक दोन चार नव्हे तर तब्बल विविध ठिकाणचे ३५० सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले होते. वरुड येथे त्यांना शोधण्यासाठी पोलिस फिरत होते. तांत्रिक मदतीने देखील नेमक्या कुठे याची माहिती मिळत नव्हती. एका मोठ्या झाडाच्या खाली सावलीत या महिला बसलेल्या आढळल्या. पोलिसांना त्यांना अटक करुन अमळनेरला आणले. न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची खानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.