नगरपालिकेकडील थकबाकी व वीज वितरणच्या आडमुठे धोरणामुळे फैजपूर शहर अंधारात
फैजपूर : प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
वीज वितरण कंपनीची नगरपालिकेकडे असलेल्या थकबाकीमुळे आज सायंकाळी पासून येथील वीज वितरण अभियंत्याने फैजपूर शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुरू करू नये असे कर्मचाऱ्यांना सांगितल्यामुळे संपूर्ण फैजपूर शहरातील जनतेला अंधाराचा सामना करावा लागत आहे. नगरपालिका व वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, वीज वितरण कंपनीची नगरपालिकेकडे 15 ते 20 लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम तात्काळ भरावी असे वीज अभियंत्याने नगरपालिकेला सांगितले. दरम्यान वीज वितरण कंपनीचे कार्यालय नगरपालिकेच्या मालकीतील इमारतीमध्ये असल्याने या इमारतीची भाडे थकीत असल्याचे नगरपालिकेकडून समजते. आज तात्काळ नगरपालिकेने सात लाखाचे दोन चेक वीज वितरण कंपनीला देण्यासाठी काढले. त्या संदर्भात अभियंता श्री सरोदे यांना फोन करून सांगण्यात आले. मात्र रात्रीचे नऊ वाजले तरी अभियंता सरोदे यांनी दखल न घेतल्याने गावातील जुने हायस्कूलमध्ये असलेले वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर असंख्य नागरिकांनी धाव घेऊन संताप व्यक्त केला. यावेळी एपीआय रामेश्वर मोताळे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी उपस्थित झाले उपस्थित झाले. मात्र दोन तास गावातील पत्रकार, नागरिक, नगरपालिकेची कर्मचारी तात्कळत उभे राहूनही वीज वितरण चे अभियंते श्री सरोदे कार्यालयात उपस्थित झाले नाही. पूर्ण शहर अंधारात असल्याने काही अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपालिका व वीज वितरण या दोघांच्या भानगडी मध्ये नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना वेठीस धरण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.