बांधकाम बंद करून अतिरिक्त केलेले बांधकाम काढून टाकण्याचे सक्त आदेश
फैजपूर खान्देश लाईव्ह प्रतिनिधी – येथील विद्यानगर मधील प्लॉट धारकाने घर बांधकाम करताना शासनाचे तसेच नगरपालिकेच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता तसेच बांधकाम करण्यापूर्वी नगरपालिकेकडून घराचा आराखडा (प्लॅन) मंजूर न करता आपल्या मर्जीने बांधकाम केल्याने सदर बांधकाम नोटीस मिळताच तात्काळ बंद करून अतिरिक्त बांधकाम काढून टाकण्याचे आदेश मुख्याधिकारी फैजपूर यांनी दिले आहे. त्यामुळे शहरात अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फैजपूर शहरातील सर्वात जुनी कॉलनी म्हणून ओळख असणारी विद्यानगर भागात गणपती व हनुमान मंदिरा जवळ गट नंबर ९३४ मधील प्लॉट नंबर ८ मध्ये मोहित अनिल कुकरेजा हे नवीन घराचे बांधकाम करीत आहे. त्यांनी (कै. डॉ. व्ही. सी. चौधरी यांचे जुने घर ) विकत घेऊन ते पाडण्यात आले. व त्या एका प्लॉटचे दोन भाग करून पश्चिमेकडील दोन रस्त्यांना लागून असलेल्या अर्ध्या भागाचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र सदर प्लॉट मालकाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १८९ अन्वये व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ व ५४ अन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार सदर प्लॉटच्या लागून असलेल्या दोघं बाजूंना नियमानुसार मोकळी जागा सोडलेली नाही. याबाबत येथील रहिवाशांनी नगर परिषदेकडे तक्रार अर्ज दिलेला होता. या तक्रारीची दखल घेत नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी समीर शेख यांनी वरील नियमाच्या अधीन राहून मोहित कुकरेजा यांना दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लेखी नोटीस बजावली आहे. या नोटीशी अन्वये विनापरवानगी करीत असलेले अतिरिक्त बांधकाम तात्काळ बंद करून केलेले अतिरिक्त बांधकाम काढून टाकावे अन्यथा आपल्यावर वरील शासकीय नियमानुसार कारवाई प्रस्थावित केली जाईल व होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल असा आदेश दिला आहे. आता सदर प्लॉट धारक बेकायदेशीर केलेले बांधकाम काढून घेतो किंवा नगरपालिकेला कारवाई करावी लागते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.