न्यायालय परिसरात दोन गट आमने-सामने : दोन्ही गटातील तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – लहान मुलांना पळवून नेत असल्या संशयावरुन तलवार घेवून धार्मीक स्थळातील पाण्याचा माठासह प्लास्टीक टाकीची तोडफोड करणाऱ्या संशयित प्रवीण रमेश कोळी (रा. पिंजारीवाडा, वाल्मिक नगर) याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याठिकाणी दोन्ही गटातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत घोषणाबाजी केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी न्यायालयाच्या आवारात घडला. यामुळे परिसरात ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, संशयित प्रवीण कोळी याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील वाल्मिक नगरातील पिंजारी वाड्यात पैसे मागण्यासाठी आलेले काही जण लहान मुलांना पळवून नेत असल्याचा संशय त्या परिसरात राहणारा प्रवीण कोळी याला आला. त्यामुळे तो हातात तलवार घेवून त्यांचा परिसरात शोध घेत होता. दरम्यान, ते संशयित त्याच परिसरात असलेल्या एका धार्मीक स्थळामध्ये लपून बसल्याचा त्याला संशय आल्याने तो थेट त्याठिकाणी गेला. तेथे जावून तो जोरजोरात शिवीगाळ करीत असल्याचे परिसरातील नागरिकांनी त्याला हटकले. यावेळी प्रवीण कोळी याने त्याच्या हातातील तलवारीने धार्मीक स्थळाच्या आवारात असलेला पाण्याने भरलेला माठ फोडला तसेच त्याठिकाणी राहणारे अफसर रशिद पिंजारी यांच्या घरासमोर ठेवलेली पाण्याची टाकी देखील फोडून नुकसान केले होते. याप्रकरणी संशयित प्रवीण कोळी याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी हुल्लड बाजी करीत जमावाला चिथावणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत तणाव निर्माण करणाऱ्यांवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, न्यायालयाने संशयित प्रवीण कोळी याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याला पोलिस बंदोबस्तात जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली.