पंतप्रधानांनी रायपूर जि.प. शाळेतील विद्यार्थिनीला पाठवले आभार पत्र
जळगाव – रक्षाबंधनाचे औचित्य साधून तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी नारायणी किरण धनगर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली होती. त्याचे उत्तर म्हणून पंतप्रधानांनी पत्र पाठवून तिचे आभार मानले आहे. सदरचे पत्र मुख्याध्यापिका चित्रलेखा वायकोळे व वर्गशिक्षिका सुचिता पांढरकर यांच्या हस्ते नारायणी व तिची आई कांचन धनगर यांना प्रदान करण्यात आले.
रक्षाबंधन सणाच्या दिवशी आपल्या भाऊला राखी बांधल्यानंतर इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी नारायणी किरण धनगर ही शाळेत आली. आपल्या वर्गशिक्षिका सुचिता पांढरकर यांच्याशी बोलताना तिने माझी आई मुख्यमंत्री यांची लाडकी बहिण आहे तर माझा भाऊ कोण? मी कुणाला राखी बांधू? असा प्रश्न विचारला. तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तू राखी पाठवू शकते, असे वर्गशिक्षिका यांनी सांगितले. तेव्हा नारायणीने स्वतःच्या हाताने राखी बनवली. वर्गशिक्षिका सुचिता पांढरकर यांनी तिला पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता शोधून दिला. त्यानंतर ही राखी पाकिटात घालून नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली. त्याचे उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायणी हिला आभार पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, भाऊ-बहिणींचे प्रेम वाढवणारा रक्षाबंधन हा सण आहे. नारीशक्ती प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन आपले स्वप्न साकार करीत आहे. आमच्या बहिणी-मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भव्य व विकसित भारत निर्मितीसाठी भारत वेगाने पुढे जात आहे. त्यात नारीशक्ती देशाच्या विकासाला नवीन उंचीवर नेण्यात सहभागी होत आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी समाजाच्या उत्कृष्ट कार्यात आपण योगदान द्याल, असा मला विश्वास आहे. आपण पाठवलेल्या राखीबद्दल आपले आभार तसेच आपल्या उत्तम आरोग्य, शांती व समृद्धीसाठी सदिच्छा व्यक्त करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून पत्रात खाली स्वाक्षरी आहे.
चौकट –
आपल्या सणांविषयी आम्ही विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे माहिती देत असताे. याचवेळी त्यांच्या प्रतिक्रिया व अनुभव देखील जाणून घेत असतो. रक्षाबंधनानंतर इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थिनी कल्याणी धनगर हिने अनुभव सांगताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवण्याचा उपक्रम मनात आला. नारायणी हिने बनवलेली राखी पंतप्रधान कार्यालयाला पाठवल्यानंतर या पत्राचे खूप छान व अप्रतिम उत्तर आले आहे. त्यामुळे आम्ही सर्व आनंदित झालो आहोत. या उपक्रमामुळे विद्यार्थिनीच्या सृजनशीलतेला संधी मिळाली आहे.
– सुचिता पांढरकर, उपशिक्षक,
जि.प. मराठी शाळा रायपूर, ता.जि. जळगाव