परधाडे रेल्वे अपघात : रेल्वेतील चहा विक्रेता आता चौकशीच्या ‘रडार’वर !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – परधाडे येथे झालेल्या रेल्वेत आग लागली, याची बोंब ठोकल्यामुळे एकाने रेल्वे बोगीतील चेन ओढली आणि रेल्वे थांबताच प्रवाशांनी उड्या घेतल्या. त्यामुळे १२ जणांचा समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला, या निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोहोचली आहे. त्यामुळे बोंब ठोकणारा रेल्वेतील चहा विक्रेता आता चौकशीच्या ‘रडार’वर आहे.
पुष्पक एक्स्प्रेस जळगाव स्थानकावरून पाचोऱ्याकडे निघाली. तेव्हा काहीसा धूर निघत असल्याचे चहा विक्रेत्याने पाहिले. त्यानंतर त्याने आग लागल्याची बोंब ठोकली. त्यामुळे जनरल बोगीतील प्रवासी घाबरले. त्यातील एका चेन ओढली. त्यामुळे रेल्वेचालकाने वेग आवाक्यात आणत परधाडे स्थानकावर गाडी थांबविली. त्यानंतर जीवाच्या भीतीने प्रवाशांनी क्षणातच उड्या घेतल्या. तशातच समोरून कर्नाटक एक्स्प्रेस प्रतितास ११०च्या वेगाने आली आणि १२ जणांना चिरडून पुढे निघून गेली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वेतील गार्ड,
लोकोपायलट व स्टेशन मास्तरची चौकशी सुरू केली आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात जखमी प्रवाशांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी रेल्वे प्रशासनाने जबाब नोंदविल्यानंतर प्राप्त माहितीनुसार बोगीत चहा विकणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
रेल्वे प्रशासनाने भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकावरून काही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यानुसार या चहा विक्रेत्याचा शोध घेतला जात आहे. चहा विक्रेता ताब्यात आल्यानंतर त्याचा जबाब नोंदविला जाणार आहे. त्यानंतर त्याच्याविरुद्ध कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे.