परिवार गच्चीवर झोपेत असतांना चोरट्यांनी मारला डल्ला !
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कुटुंब घराबाहेर आणि गच्चीवर झोपल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरात घुसून रोकडसह सोन्याचे दागिणे असा सुमारे ७४ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील तळेगाव येथे घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तळेगाव येथील उद्धव अर्जुन शिंगाडे हे २७ रोजी रात्री ८ वाजता जेवण करून कुटुंबासह गच्चीवर झोपण्यास गेले तर त्यांचे आई व वडिल घराबाहेर अंगणात झोपलेले होते. शिंगाडे हे रात्री २ वाजता घरात चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल घेण्यास गच्चीवरून घरात आले असता त्यांना घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले. कपाटाच्या लॉकरमधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ३४ हजारांची १० ग्रॅमची मणी असलेली सोन्याची पोत व रोख ४० हजार रूपये असा सुमारे ७४ हजारांचा ऐवज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात चोरट्याने किचनमधील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश करून बेडरूमधील लोखंडी कपाटातील सुमारे ७४ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना २८ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.