Sunday, April 27, 2025
Homeगुन्हापाळधीतील जाळपोळ प्रकरण : ७ जणांना अटक तर १८ संशयितांचा शोध सुरु...

पाळधीतील जाळपोळ प्रकरण : ७ जणांना अटक तर १८ संशयितांचा शोध सुरु !

पाळधीतील जाळपोळ प्रकरण : ७ जणांना अटक तर १८ संशयितांचा शोध सुरु !

धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – हॉर्न वाजवूनही रस्ता न दिल्याने मंगळवारी रात्री येथे झालेल्या हाणामारी, जाळपोळ व लुटालुट प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात वाहन चालकाच्या फिर्यादीनंतर आता बुधवारी दुस-या गटाकडूनही विरोधी तक्रार देण्यात आली आहे.

गावात संचारबंदी गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र विक्रम पाटील यांच्या नावे असलेल्या वाहनावरुन हा वाद झाल्याने आता पोलिस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान पाळधी गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये घनश्याम दिनेश माळी, निलेश गणेश माळी अनिल ऊर्फ विकी रामदास गुजर, सचिन सुधाकर पाटील, रोहन दिनेश माळी, प्रवीण अरुण माळी, अरुण भिका माळी यांचा समावेश आहे. उर्वरित १८ संशयितांचा शोध घेतला जात आहे. सात जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ३१ डिसेंबर मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास वाहनातून (कार क्र. एम. एच. १९ सीव्ही-८०९०) गुलाबराव पाटील यांच्या परिवारातील महिला सदस्या लाडली गावाकडून पाळधीकडे येत होत्या, असे समजते. त्यावेळी वाहनचालक अमोल बागूल याने रस्त्यावर थांबलेल्या तरुणांना हॉर्न वाजवून बाजूला होण्याबाबत इशारा दिल्याने किरकोळ वाद झाला. दरम्यान, या वादाची माहिती होताच दोन गट समोरा समोर आले. यातून वाद वाढला आणि जमावाने दुकानांची तोडफोड व जाळपोळ केली. याबाबत जावेद पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

 

तर विरोधात अमोल बागुल (कारचालक) यांनी सुद्धा फिर्याद दिलेली आहे. घटना घडताच जळगावहून अतिरिक्त पोलिस कुमक मागवण्यात आली. तसेच गावात दंगा नियंत्रक पथक तैनात करण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी रात्रीच पाळधीला भेट दिली होती. याशिवाय जिल्ह्यातील इतर अधिकारीही पाळधीत पोहचले. ते पाळधीत तळ ठोकून आहेत.या घटनेसंदर्भात पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार नोंद घेण्यात आली आहे. यात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबातील काही सदस्य होते, अशी चर्चा असल्याने त्याविषयी विचारणा केली असता रेकॉर्डवर तसे कोणतेही नाव नसल्याचे सांगण्यात आले. मात्र तक्रारीत जी नावे आहेत त्यानुसार नोंद केली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या