प्रयत्नातील सातत्य यशाचा राजमार्ग डॉ नरेंद्र महाले
यावल दि.९ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आज दि.९जानेवारी २०२५ रोजी साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “एक पाऊल करिअरच्या दिशेने ” या विषयावरती डॉ.नरेंद्र महाले यांचे ११ वी व १२ च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन संपन्न झाले या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून ए.एस इंगळे,मार्गदर्शक डॉ.नरेंद्र महाले होते.
विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये करिअर निवडताना स्वतःच्या क्षमतांचा वापर करणे नितांत गरजेचे आहे. भविष्याचा वेध घेताना वर्तमान काळामध्ये केलेले परिश्रम हे फलदायी ठरतात हा मुख्य मुद्दा डॉ. महाले यांनी प्रखरपणे मांडला.जो व्यक्ती आयुष्यामध्ये त्याच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवतो,तो आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो आणि सातत्याने केले जाणारे प्रयत्न हाच त्याचा यशाचा राजमार्ग असतो.दैनंदिन जीवनामध्ये उत्तम नियोजन,सातत्य,परिश्रम व स्वतःच्या क्षमतांची जाणीव या बाबींची गोळा बेरीज केली की व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाबरोबर,स्वतःच्या आयुष्याला देखील उत्तम पद्धतीने आकार देऊ शकतो,यावर डॉ. महाले यांनी आपले मत मांडले. यशस्वी माणसाच्या जीवनात शॉर्टकट नावाचा शब्द हा नसतो.तो व्यक्ती फक्त ज्ञानार्जन करत आपल्या कौशल्याच्या आधारे, प्रगतीच्या वाटेवर सातत्याने चालत राहतो. या मार्गदर्शनाबरोबरच अनेक वैचारिक गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन देखील डॉ. महाले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्चमाध्यमिक सर्व शाखांचे प्राध्यापक शिक्षक बंधू भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अनिल सोनवणे यांनी मानले.