बाप्पाला निरोपासाठी भुसावळ पालिका सज्ज
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी भुसावळ पालिकेने विशेष तयारी केली आहे. तापी नदीकाठवर विसर्जनस्थळी स्वच्छता, पाणी, सर्चलाइट, लाइफगार्ड, निर्माल्य कलश व कृत्रिम कुंडाची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहेत. गणेशभक्तांना सुविधा मिळाव्यात, यासाठी नगरपालिका आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे.लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भुसावळ शहरात पालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी नागरिकांना कोणत्याही अडीअडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी पालिकेचे विविध विभाग रात्रीचा दिवस करून सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाले आहेत. गणपती
बाप्पाला निरोप देण्यासाठी शासनाकडून जरयत तयारी सुरू करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीला सर्वच घरांतील गणरायांना निरोप दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी तापी नदी काठावर विविध विसर्जनस्थळे निश्चित करण्यात आले आहेत. मोठे सार्वजनिक गणपती वगळता घरगुती गणेशमूर्ती या कृत्रिम हौदात विसर्जित केले जाणार आहेत. सध्या सर्वत्र भजन, कीर्तन, आरत्यांचे स्वर कानी पडत असून भक्ती व आस्थेचा सुगंध सर्वत्र दरवळत असून. बहुतांश भाविक अनंत चतुर्दशीलाच बाप्पाचा रात्री बारा वाजेपर्यत दिलेल्या वेळेत निरोप घेणार आहेत.
विसर्जनस्थळी कर्मचाऱ्यांच्या तैनाती
विसर्जनप्रसंगी ७० जणांचे बचाव पथक तैनात राहणार आहे.राहुलनगर घाटावर ३० हॅलोजन, दोन्ही ठिकाणी ३ टॉवर लाईट तात्पुरत्या स्वरुपात बसवण्यात येणार आहे. तर तापी नदीच्या उत्तरेकडील दुसऱ्या काठावर १० हॅलोजन लाइट,आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २८ जणांचे बचाव पथक तर पालिकेचे ७० पट्टीचे पोहणारे जीवनरक्षक नदीपात्रात उपस्थित राहतील. पालिकेने यंदाही गणेश विसर्जनासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे.पालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या स्थळी कर्मचाऱ्यांचे पथक तैनात राहणार आहेत. सकाळी ९ ते रात्री १२ वाजे पर्यंत हजर राहणार आहेत. कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी गणवेशात व ओळखपत्र समोर ठेवून हजर राहावे, अन्यथा पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे.
विसर्जन घाटांवर सुसज्जता
आपत्कालीन स्थितीसाठी बोट, डोंगे, फायर ब्रिगेड, मोठे दोरखंड, टॉर्च आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. विसर्जन स्थळी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. विसर्जन घाटावर प्रखर विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तापी नदी काठावर विसर्जन स्थळी १० दिवसांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे. हे विसर्जन विनाअडथळे पार पाडावे यासाठी विसर्जन ठिकाणी पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय मिरवणुकांना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी सालाबादाप्रमाणे यंदाही बसस्थानक वरणगाव रोड वरील एसटी डेपो मध्ये हलवले जाणार आहे. वरणगाव रोड व महामार्गा वरून एसटीची वाहतूक होईल. तर जामनेर रोड अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे.अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने महाकाय सुंदर मूर्तींच्या मनोहारी मिरवणुका पाहण्यासाठी तालुक्यातून भाविक येतात त्यात भुसावळकरांची मोठी गर्दी उसळते. या गर्दीचे योग्य पद्धतीने नियोजन व्हावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भुसावळ पालिकेसह पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे.
नागरिकांनी बाप्पाला निरोप देताना खोल पाण्यात जाऊ नये. पालिकेने भाविकांच्या सुविधांसाठी उपाययोजना केल्या आहेत. सुविधांचा लाभ घ्यावा, नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाविकांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात.
राजेंद्र फातले(मुख्याधिकारी भुसावळ नगरपालिका)