भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बांधकामाच्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी जात असलेल्या दाम्पत्याला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अनिता सुनील राणे (वय ५२, रा. सतगुरुनगर) ही महिला कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ही घटना बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अयोध्या नगरातील सतगुरु नगरात अनिता राणे या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. त्यांचे रिंगरोड परिसरात घराचे बांधकाम सुरु असल्याने त्या पती सुनिल बाबुराव राणे यांच्यासोबत पाणी भरण्यासाठी दुचाकीने रिंगरोड येथे जाण्यासाठी निघाल्या. घरापासून काही अंतरापर्यंत गेल्यानंतर अजिंठा चौफुलीवर भुसावळकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने राणे दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे राणे दाम्पत्य हे रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात अनिता राणे या कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचे डोक हे शरिरापासून वेगळे झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी रतन गिते हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिल राणे यांना रुग्णालयात दाखल केले. तर ठार झालेल्या महिलेचा मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. अनिता राणे यांच्या पश्चात पती, मुलगा तन्मय, मुलगी आदिती असा परिवार आहे.
शहरातून गेलेल्या महामार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून अपघाताची मालिका सुरुच आहे. याठिकाणाहून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेक निष्पांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांचे डोक्यावरील छत्र या अपघांमुळे हरपले आहे. अनिता राणे हे कंटेनरच्या चाकाखाली आल्या तर सुनिल राणे हे रस्त्यावर फेकले गेलयाने ते देखील गंभीर जखमी झाले. पहाटेच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ नसल्याने कंटेनर चालकाने तेथून पसार झाला. दरम्यान, त्याठिकाणाहून जाणाऱ्या रिक्षा चालकाने एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.