भाजपा समोर अध्यक्ष निवडीचा प्रश्न ; अध्यक्षांना उमेदवारी दिल्याने कसोटी !
संतोष शेलोडे, संपादक खान्देश लाईव्ह न्यूज – महाराष्ट्र राज्याच्या विधासभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या निवडणुकीच्या महासंग्रामात मुख्य पक्षासह अनेक जण आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत भाजपच्या समोर विरोधी पक्षासह प्रदेशाध्यक्ष आणि जळगाव जिल्हा पूर्व चे अध्यक्ष देण्याचा पेच निर्माण झाला आहे.
भाजपात सहसा एक व्यक्ती एक पद अशीच संकल्पना असते. निवडणुकीच्या धामधुमीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांना कामठीतून तर भाजपा जळगाव जिल्हा पूर्व चे अध्यक्ष अमोल जावळे यांना रावेर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी जाहीर देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हेच स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असल्याने प्रदेशाचे स्वतःच्या निवडणुकीसोबत राज्याच्या भाजपाच्या उमेदवारांचे निवडणुकीचे नियोजनहि त्यांच्याकडे असू शकणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणी बावन्नकुळे कशा प्रकारे नियोजन करतात किंवा पक्ष त्यांचा प्रभार कुणाकडे देतो हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे.अशीच स्थिती जळगाव पूर्व चे जिल्हाध्य्क्ष अमोल जावळे यांची असणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या याभागात जामनेर , भुसावळ , रावेर ,मुक्ताईनगर या जागा भाजपने गेल्या निवडणुकीत लढविल्या आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना रावेर विधानसभा मतदार संघासह जळगाव जिल्हा पूर्व चे नियोजन लावावे लागणार आहे.
अशा स्थितीत प्रदेशाध्यक्ष आणि जळगाव जिल्हा पूर्व चे अध्यक्ष यांचा पदभार कुण्या अनुभवीकडे वर्ग केला जातो किंवा तसाच ठेऊन रणसंग्रामास तोंड दिले जाते हे लवकरच स्पष्ट होईल .