भारतीय सैन्याप्रती प्रचंड आदर व सन्मान – प्रा. डॉ. एस व्ही जाधव
फैजपूर : प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशी आपली सशस्त्र सेना असून आप्तस्वकीयांपासून लांब राहून देशसेवा बजावणाऱ्या वीर सैनिकांप्रती प्रत्येकाने अभिमान बाळगावा. एनसीसी कॅडेटस च्या मनगटावर राखी बांधून ती राखी सर्व सैनिकांना समर्पित करण्याची संकल्पना स्तुत्य असून भारतीय सैन्याप्रती प्रत्येकाने आदरभाव बाळगलाच पाहिजे असे उद्गार उपप्राचार्य प्रा डॉ एस व्ही जाधव यांनी काढले.
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आयोजित एक राखी वीर सैनिकासाठी या कार्यक्रमांतर्गत बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना पाटील, एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, कॅडेटस, विदयार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाबंधनाचा पवित्र उत्सव देशभर साजरा होत असताना देशसेवा बजावणाऱ्या वीर सैनिकांना त्यांच्या बहिणीकडून राखी बांधून घेता आली नाही. तथापि भगिनींना सुद्धा संवेदनशील क्षेत्रातील व सीमारेषेवर तैनात सैनिकांना राखी बांधता आली नाही. यासाठी एक राखी वीर सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत एनसीसी कॅडेटसच्या मनगटावरती राखी बांधून सैनिकांप्रती आदर व सन्मान व्यक्त करण्यात आला व नियंत्रण रेषेवर तैनात सैनिकांना महाविद्यालयातील विद्यार्थिनीतर्फे राख्या पाठवण्यात आल्या. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.